मुंबईला पावसाने झोडपले - २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2020

मुंबईला पावसाने झोडपले - २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा


मुंबई - गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणा-या पावसाने मंगळवारी दमदार हजेरी लावून मुंबईला चांगलेच झोडपून काढले. मध्यरात्रीपासून संततधार कोसळणा-या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले. काही ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प झाली. दादर, सायन, परळ, वडाळा येथील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने तिन्ही मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तर कांदिवलीतील पश्चिम द्रूतगती मार्गावर दरड कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र मुंबईकडे येणा-या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुंबईत २५० मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईत अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावत संततधार कोसळला. आदल्या दिवशीच हवामान विभागाने मुंबईत आधी ऑरेंज, व नंतर रेड अलर्टचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही आपली यंत्रणा सज्ज ठेवली. रात्रीपासून कोसळणा-या पावसाने मंगळवारीही सकाळपासून संतधार कायम ठेवल्याने मुंबईकरांनीही घरीच राहण्याचे पसंत केले. मुंबई व उपनगरांत पडलेल्या जोरदार पावसाने मुंबईला झोडपून काढले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. हिंदमातासह किंग्ज सर्कल, खोदादाद सर्कल, परळ, दादर, गोरेगाव, दहिसर, बोरिवली, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर शेलकॉलनी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले. दादर, सायन, परळ, वडाळा, कुर्ला येथील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेचे तीन्ही मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. हिंदमाता येथे गुडघाभर तर सायन, किंग्जसर्कल, चेंबूर शेल कॉलनी येथे येथे कंबरेवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. सांताक्रुझ- चेंबूर लिंकरोडच्या दोन्ही बाजूंना पाणी साचल्याने येथील ट्राफिक जॅम झाले होते. अनेक ठिकाणी पाण्यात वाहने अडकली. वाहतूक जॅम झाल्याने वाहनचालकांना मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. बेस्टचे सुमारे ५६ मार्ग वळवण्यात आले. हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशा-यामुळे व दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांना सुट्टी देण्यात आली. मंत्रालयही बंद ठेवण्यात आले होते. जोरदार पावसामुळे गोरेगावच्या मोतीलाल नगर, कांदिवलीच्या डहाणुकरवाडीत लोकांच्या घरात पाणी शिरले. खोदादाद सर्कल, किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर शेल कॉलनी आदी ठिकाणी घराघरात, दुकानात पाणी भरल्याने नुकसान झाले. हिंदमाता येथेही कंबरेपर्यंत पाणी साचल्याने वाहने अडकून पडली. येथील वाहतूकही बंद होती. तर कांदिवलीतील द्रूतगतीमार्गावरील सकाळी साडेसहाच्या सुमारास दरड कोसळल्याने येथील मुंबईकडे येणारी वाहतूक बंद होती. दहिसर नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. मिठी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. नदी परिसरात राहणा-या नागरिकांना इतर ठिकाणी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. बोरिवली नॅशनल पार्कच्या जवळील नाला तुंबला. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. दुपारनंतर काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाला. त्यानंतर काही तासाने हळूहळू वाहतूकही सुरु झाली. रेल्वेसेवा धिम्या गतीने सुरु होती. दरम्यान, येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अग्निशमन दल, जीवरक्षक, आरडीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. दरम्यान, पाण्याचा निचरा झाल्यानंतर दुपारनंतर रेल्वे वाहतूक धिम्यागतीने सुरु झाली.

पालिका आयुक्तांनी पाहणी करून घेतला आढावा --
सोमवारी रात्री पासून कोसळणा-या संतधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी विविध ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला. वांद्रे परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील भागाची, मिलन सबवे येथील परिसराची, अंधेरी सबवेची पाहणी केली. तसेच मुसळधार पावसांत पूरस्थितीला कारण ठरणारी मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मिठी नदीलगत असणा-या कुर्ला परिसरातील क्रांती नगर येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. किंग्जसर्कल, गांधी मार्केट, हिंदमाता येथे पाणी साचले होते. या परिसराचीही आयुक्तांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरसू, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पायाभूत सुविधा विभागाचे संचालक संजय दराडे, व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या मार्गावरील बेस्टमार्ग वळवले -
हिंदमाता, खोदाद सर्कल, चेंबूर शेल कॉलनी, प्रतिक्षा नगर, वांद्रे एसव्ही रोड, अंधेरी सब वे, सांताक्रूझ, शास्त्री नगर गोरेगाव, ओशविरा पूल अजित ग्लास जवळ, एलबीएस रोड शितल सिनेमा, बैल बाजार, कमानी कुर्ला, विद्याविहार, मालाड सब वे, एमआयडीसी मरोळ, एलबीएस रोड मुलुंड, गोल देऊळ, भेंडी बाजार, दहाणूकर वाडी कांदिवली, दहिसर सब वे आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील बेस्ट बसेसचे मार्ग वळवण्यात आले होते.

तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प -
सोमवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते वाहतुकीसह तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवाही कोलमडली. पश्चिम रेल्वेच्या दादर - प्रभादेवी स्थानकांदरम्यानचे रुळ पाण्याखाली गेल्याने वांद्रे चर्चगेट लोकल सेवा बंद पडली होती. वांद्रे - डहाणू रोड दरम्यान लोकल सेवा धिम्यागतीने सुरु ठेवण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. तर मध्य रेल्वेच्या परळ, सायन, माटुंगा व हार्बर मार्गावरील वडाळा, कुर्ला स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटी - कुर्ला तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी - कुर्ला स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद होती. वाशी - पनवेल - ठाणे स्थानकांदरम्यानची सेवा सुरु होती. तर कुर्ला - कल्याण स्थानकापुढे लोकल सेवा सुरु होती, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

कांदिवलीत दरड कोसळली, वाहतूक ठप्प
- सहा तासानंतर मातीचा ढिगारा हटवला
कांदिवली येथील द्रूतगतीमार्गावर मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सकाळची वेळ असल्याने या मा्र्गावर फारशी वाहतुकीची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावर माती व दगडाचा ढीग साचला. त्यामुळे मिरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान सहा तासानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्यात आला. मात्र त्यानंतरही या मार्गावरील काही तास वाहतूक ठप्प होती.

हिंदमाता परिसर जलमय -
मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसर जलमय झाला होता. येथे कंबरे इतके पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतून इतर मार्गाने वळवण्यात आली. काही वाहने अडकून बंद पडली. अनेक वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. कल्याणहून भायखळ्याला जाण्याासाठी निघालेली कार पाण्यात अडकून बंद पडली. कारमध्ये पाणी शिरल्याने कार चालक कारमध्ये अडकला. मात्र पालिकेच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेऊन कार चालकाला बाहेर काढल्याने चालकाचा जीव वाचला. या परिसरातील दुकानातही पाणी भरून नुकसान झाले. पालिकेने पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केल्याने काही तासाने येथील पाण्याचा निचरा झाला.

दहीसर नदीला पूर -
जोरदार पावसामुळे दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला. पालिकेने या भागात सुरक्षेच्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवली होती. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षिततेच्यादृष्टीने इतर ठिकाणी हलवले.

मिठी नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले-
दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्‍याने मिठी नदी धोक्‍याच्‍या पातळीच्‍या खाली. मात्र असे असले तरी सावधगिरी म्‍हणून लगतच्‍या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलविण्‍यात आले असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. दरम्यान उद्या, बुधवारीही अतिवृष्‍टीचा इशारा देण्‍यात आला असल्‍याने महापालिकेच्‍या सर्व यंत्रणेला सुसज्‍ज व सतर्क राहण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. परिस्थितीची संभाव्‍यता लक्षात घेत आवश्‍यक तेथे तात्‍पुरत्‍या निवा-यांचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली असल्‍याचेही महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे हाल -
सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु राहिल्याने रस्ते व तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशिर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांची उपस्थिती महत्वाची असल्याने मिळेल त्या वाहनांनी कामाच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न केला. रेल्वे बंद असल्याने काहींनी बसेसचा आधार घेतला. मात्र बसेचचे मार्गही वळवण्यात आल्याने कर्मचा-यांची धावपळ झाली.

येथे पाणी साचले --
किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, हिंदमाता, दादर, प्रभादेवी, खोदादाद सर्कल, अंधेरी सबवे, मिलन सबवे, चेंबूर शेलकॉलनी, वडाळा, कुर्ला, वांद्रे, मालवणी म्हाडा कॉलनी, अॅन्टॅाप हिल, संगमनगर, सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड, चुनाभट्टी, सांताक्रुझ, वाकोला, अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरीवली. दहिसर, परळ, वरळी आदी ठिकाणी

पावसाची नोंद -
कुलाबा -- २५२.२ मिमी
सांताक्रुझ -- २६८. ६ मिमी

संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पडलेला पाऊस-
शहर -- २१.२८ मिमी.
पूर्व उपनगर -- २३.६४ मिमी
पश्चिम उपनगर -- २४.६५ मिमी

झाडे पडली --
शहरात २९, पश्चिम उपनगरांत ५६, पूर्व उपनगगरांत १५ अशा एकूण १०० ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad