मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात जून व जुलै महिन्यांत अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आजच्या तारखेला सातही तलावात मिळून सध्या ४९९१९९ दशलक्ष लिटर म्हणजे फक्त ३५ टक्के पाणीसाठा जमा आहे. याचवेळी म्हणजे जुलै २०१९ मध्ये ८५.६८ टक्के व जुलै २०१८ मध्ये ८३.३० टक्के इतका पाणीसाठा जमा होता. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा तब्बल ५१ टक्क्यांनी कमी आहे. अत्यंत कमी आहे. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळा संपल्यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्ट २०२० पासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. सदर पाणीकपात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणा-या ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. परंतु यंदा पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. सध्या सातही धरणात ४ लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान नोव्हेंबर २०१८ मध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने १० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. २०१९ मध्ये पाणी कपात रद्द करण्यात आली होती.
तलावांत समाधानकारक जलसाठा जमा नसल्यास मुंबईकरांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा करता यावा यासाठी वर्षभराचे नियोजन व्हावे यासाठी प्रशासनाकडून काही वेळा पाणीकपात केली जाते. मात्र यावर्षी अजून पावसाचे दोन महिने शिल्लक असल्याने समाधानकारक पाऊस होऊन लवकरच ही पाणीकपात मागेही घेतली जाईल, असा विश्वास वाटतो.
- किशोरी पेडणेकर, महापौर
- किशोरी पेडणेकर, महापौर
No comments:
Post a Comment