मुंबई - शहर परिसरात किती नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, किती टक्के नागरिकांमध्ये उच्च प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. हे तपासण्यासाठी सॅरो सर्व्हे करण्यात येतो. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात एक सर्व्हे पूर्ण केला असून आता परवा, गुरुवारपासून दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हेला सुरुवात होणार आहे. आधीच्याच तीन विभागात हा सर्व्हे होणार असून यासाठी पालिकेकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
नागरिकांच्या रक्तात कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत का? यासाठी अँटिबॉडीजची तपासणी केली जाते. यातून किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना समजलेही नाही, काहीही उपचार न घेता ते बरे झाले हे समोर येते. त्यानुसार पालिकेने पहिल्या टप्प्यात आर दक्षिण, एम पश्चिम आणि एफ उत्तर या तीन विभागात 6000 हुन अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली होती.
यात झोपडपट्टी भागातील 57 टक्के नागरिकांमध्ये तर बिगर झोपडपट्टीतील 16 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्याचे सिद्ध झाले. म्हणजेच इतक्या लोकांना कोरोना झाला पण, त्यांना कळलेही नाही. दरम्यान, उच्च प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 70 टक्क्यांहुन अधिक लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार होणे गरजेचे आहे. असे असले तरी प्रतिनिधीक स्वरूपात पालिका सॅरो सर्व्हेच्या माध्यमातून किती लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत, याचा आढावा घेण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सर्व्हे करत आहे.
हा सर्व्हे 10 ऑगस्टला सुरू होणार होता. पण, आता मात्र तो 13 ऑगस्ट, गुरुवारपासून सुरू होणार आहे. एम पश्चिम, आर दक्षिण आणि एफ उत्तर या भागात गुरुवारपासून सर्व्हे सुरू होईल. एम पश्चिम विभागात 2000 लोकांचे सर्व्हेक्षण होईल. यासाठी त्या नागरिकांची संमती घेतली जाईल, अशी माहिती एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली आहे. तर आर दक्षिण विभागात झोपडपट्टीतील 1200 तर बिगर झोपडपट्टी भागातील सुमारे 600 नागरिकांची यावेळी तपासणी होईल, अशी माहिती आर दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment