सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची तुंबई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2020

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची तुंबई



मुंबई - सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मंगळवारी मुंबईची तुंबई झाली होती. आज पुन्हा वादळी वाऱ्यासह मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने येथे पुन्हा तुंबई झाली. विशेष म्हणजे, आज हिंदमाता, किंग सर्कल, सायन यासारख्या सखल भागासह उच्चभ्रू वस्ती असलेल्या बाबूलनाथ, पेडर रोड, मंत्रालय आदी भागातही यावेळी पाणी साचले. पाणी साचल्यामुळे बेस्ट व अन्य खासगी वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. तर, मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने सीएसएमटी ते कुर्ला, वाशीपर्यँत रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईत मंगळवारी सखल भागात पाणी साचले. मंगळवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. पावसाने हजेरी लावली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसल्याने शहरात सकाळी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, बुधवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, अब्दुल रहेमान स्ट्रीट, गोल देऊळ, भायखळा जेजे जंक्शन, सक्कर पंचायत, खेतवाडी, पोस्टल कॉलनी चेंबूर, सीएसटी रोड कुर्ला, या ठिकाणी पाणी साचले. यामुळे माटुंगा गांधी मार्केट येथील बेस्टच्या बसेसची वाहतूक भाऊ दाजी रोड वरून तर सायन रोड नंबर 24 वरील वाहतूक हेमंत मांजरेकर मार्गावरून वळवण्यात आली आहे. येत्या २४ तासांत शहर व उपनगरात जोरदार पाऊस पडण्याची तर काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  

शहर भागात २२९ मिमी पाऊस -
आज बुधवारी सकाळी ८.३० पासून ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत मुंबईत जोरदार पाऊस पडला. कुलाबा येथे २२९.०६ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ६५.०८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती कुलाबा वेध शाळेने दिली आहे. केली आहे. पालिकेच्या पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदीनुसार, शहर भागात - १७०.०६ मिलीमीटर, पूर्व उपनगर भागात - ५६.०३ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात - ५९.३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

घराचा भाग कोसळून २ जण जखमी -
शहर व उपनगरात ६ ठिकाणी घरे व घरांच्या भिंतींची पडझड झाली. भांडुप पश्चिम, अंजना इस्टेट चाळ येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एक मजली घराच्या गॅलरीचा भाग अचानक कोसळला. या घटनेत अजय अगरवाल (४८) आणि कांती अगरवाल (६६) हे दोघेजण जखमी झाले. त्यांना तत्काळ नजिकच्या पालिकेच्या एम.टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


झाडांची पडझड, शॉकसर्किट -
मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने मंत्रालय, गिरगाव आदी भागात झाडांची पडझड झाली. शहर भागात ११२, पूर्व उपनगरात १६ तर, पश्चिम उपनगरात १३ अशा एकूण १४१ ठिकाणी झाडे व फांद्यांची पडझड झाली. तसेच शहर व उपनगरात १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.

बेस्टच्या ३३ बसगाड्या ब्रेकडाऊन -
मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. रेल्वे सेवा बंद पडल्याने अनेकांनी मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्टकडे धाव घेतली. मात्र, रस्त्यावर पाणी साचले असल्याने त्यात बेस्टच्या बस अडकल्या. मुंबईत साचलेल्या पाण्यात बेस्टच्या ३३ गाड्या अडकल्याने नुकसान झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad