मार्च महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात मेट्रो रेल्वे प्रकल्प, पूल, उड्डाणपूल असे पायाभूत प्रकल्प रखडले होते. अशा १९ प्रकल्पांच्या कामात अडथळा ठरणारी २५९३ झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी १२००हून अधिक झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. जून महिन्यात १९०० झाडे तोडण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानंतर आता आणखी ६३२ झाडे तोडणे व पुनर्रोपण करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना आल्यानंतर हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी येणार आहे.महापालिकेने आपल्या संकेतस्थळावरून तसेच वृत्तपत्रांद्वारे २३ जून रोजी हरकती व सूचना मागवल्या. मात्र यासाठी नागरिकांना केवळ सात दिवसांचा कालावधी देण्यात आला. सध्या मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांच्या घरी वृत्तपत्रे येत नाहीत.तसेच कमी लोकघराबाहेर पडत असल्याने वृक्षांवर लावण्यात येणाऱ्या नोटीसकडे कोणाचे लक्ष जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने घाईघाईने नोटीस काढून वृक्ष तोडण्याचा घाट घालणे संशयास्पद आहे, अशी नाराजी पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
नियमानुसारच वृक्ष तोडणे व पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव येणार आहेत. तत्पूर्वी नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून त्यांचाही समावेश प्रस्तावात असेल, असे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.लॉकडाऊनमध्ये १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव आले. आता अजून ६३२ झाडे तोडणे किंवा प्रत्यारोपण करण्याचा प्रस्ताव तयार आहे. चारशे वर्षे जुना एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढे कौतुक करून घेतले. पण मुंबईत झाडांचा कत्तलखाना सुरू आहे, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.
वर्सोवा येथील एका झाडावर नोटीस पाहिल्यानंतर माहिती काढली असता सुमारे अडीच हजार झाडे तोडण्याचे प्रस्तावित असल्याचे समजले. खरोखरच या झाडांची कत्तल करून काम करण्याची गरज आहे का? याची शहानिशा होणे गरजेचे आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या घरात वृत्तपत्र येत नसताना जाहिरात देऊन सूचना व नोटीस मागवणे अयोग्य आहे.
- झोरूबाथेना, सामाजिक कार्यकर्ते
No comments:
Post a Comment