मुंबई - शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आज शरद पवार थेट मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. आज पवार यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही होते. सुमारे पाऊण ते एक तास या तिघांत चर्चा झाली. या भेटीनंतर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी गेले काही दिवस आघाडीत जे काही 'धुमशान' सुरू आहे, त्यातूनच ही तातडीची भेट घडल्याचे स्पष्ट आहे.
सत्तेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांत कुरघोडीचं राजकारण रंगलं आहे. राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही आघाड्यांवर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. ठाणे जिल्ह्यातील चार पालिका आयुक्तांच्या बदल्या, त्यानंतर नवी मुंबईच्या आयुक्तांची रद्द झालेली बदली, ठाणे जिल्ह्यातील लॉकडाऊन, पारनेर नगर पंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश, कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीला शह देत शिवसेनेची भाजपसोबत युती, मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचा गोंधळ या सगळ्या घटनांमधून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सत्ताधारी पक्षांतील मनभेद चव्हाट्यावर आले आहेत. या कुरघोडीच्या राजकारणाने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले असल्यानेच शरद पवार यांना मैदानात उडी घ्यावी लागल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या हा सर्वात कळीचा विषय ठरला आहे. गृहमंत्रालयाला कोणतीही कल्पना न देता या बदल्या करण्यात आल्या. ही बाब लक्षात येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदल्या तडकाफडकी रद्द केल्या. हा एकंदरच निर्णय राष्ट्रवादीला रूचलेला नाही. त्यामुळेच पवार गृहमंत्री देशमुख यांना घेऊन मातोश्रीवर गेले होते असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री ठाकरे व पवार यांच्यात आज गेल्या काही दिवसांतील बऱ्याच घडामोडींवर चर्चा झाली. त्यात समन्वयाचा अभाव कुठेही असू नये. कोणताही निर्णय घेताना त्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. चर्चा व समन्वयातून निर्णय झाल्यास पुढे होणारी नामुष्की टळेल, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते. शरद पवार व अनिल देशमुख मातोश्री निवासस्थानाहून निघाल्यानंतर काही वेळातच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचे कळते. पारनेर आणि कल्याणमधील फोडाफोडीच्या राजकारणावर या नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे.