मुंबई - भारतीय हवामान विभागामार्फत दिनांक ०४.०७.२०२० रोजी मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. तर याच दिवशी म्हणजे उद्या शनिवार दिनांक ४ जुलै २०१७ रोजी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती असणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व २४ विभाग कार्यालयांसह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ आवश्यक ती कार्यवाही अंमलात आणता येईल.
महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती विषयक सुनिश्चित कार्यपद्धती कार्यन्वित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे :
√ महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना 'हाय अलर्ट' देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
√ पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
√ बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
√ बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
√ भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे.
√ बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या 'बेस्ट' उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
√ संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे संदेश SMS पाठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
√ मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
√ आणीबाणी मदत यंत्रणांपैकी मुंबई पोलीस दल, महापालिकेचे मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, पर्जन्य जलवाहिन्या यासारख्या विविध यंत्रणाचे समन्वय अधिकारी, मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
√ मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यकतेनुसार क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था 'एल' विभागाच्या 'एल' विभागा मार्फत करण्यात येणार आहे.
√ यापूर्वीच निर्धारीत करण्यात आल्यानुसार महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या मनपा शाळा त्वरीत मदतीकरिता सुसज्ज आहेत.