मुंबई - मुलूंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकूल या ४ ठिकाणी मिळून उभारण्यात आलेल्या विविध कोरोना आरोग्य केंद्रातील एकूण ३ हजार ५२० रुग्णशय्या (बेड) कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध होणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे उद्या (दिनांक ७ जुलै २०२०) दुपारी १.३० वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे.
या समारंभात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्यासह विविध मान्यवर ठिकठिकाणच्या प्रक्षेपण प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.
लोकार्पण होत असलेल्या केंद्रांपैकी, मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या जागेत १ हजार ७०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र 'सिडको'च्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. यातील सुमारे ५०० रुग्णशय्या ठाणे महानगरपालिकेसाठी आरक्षित करुन देण्यात आल्या आहेत. दहिसर (पूर्व) येथे 'मुंबई मेट्रो'च्या सहकार्याने सुमारे ९०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. तर दहिसर (पश्चिम) येथे कांदरपाडा परिसरात समर्पित कोरोना रुग्णालय उभारण्यात आले असून याठिकाणी १०८ अतिदक्षता उपचार (आयसीयू) सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध आहेत.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून तेथेही ७०० रुग्णशय्या उपलब्ध आहेत. तर वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या दुसऱया टप्प्यातील समर्पित कोरोना आरोग्य केंद्रात ११२ रुग्णशय्या अतिदक्षता उपचार (आयसीयू) करण्यासाठी असतील. एमएमआरडीएने हा दुसरा टप्पादेखील महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला असून ते आता प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर खाटा उपलब्ध होणार असल्याने कोविड १९ संसर्ग बाधितांसाठी उपचारांची मोठी सोय होणार आहे.