मुंबई - मुलुंडमध्ये करोडो रुपये खर्च करून सिडको मार्फत उभारलेल्या कोव्हिड सेंटर येथे अपुऱ्या वैद्यकीय टीम, तसेच आयसीयू बेड व डायलिसिस बेड यांची अपुरी सुविधा आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये तातडीने सर्व सुविधांची पूर्तता करावी करण्याची मागणी भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच कोविड सेंटरच्या कामात दिरंगाई व भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई विभागात दिवसेंदिवस कोव्हिड रूग्णांची संख्या वाढत असताना शासनाकडून वैद्यकीय जम्बो फॅसिलिटी उभारण्यात आल्या आहेत. त्यातील एक महानगर पालिका 'सिडको'च्या संयुक्त नियोजनातून मुलुंडमध्ये उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कोव्हिड-१९ हॉस्पिटल उभारण्याचे निश्चित झाले आहे. या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्याते जाहीर करून ७ जुलै रोजी याचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या सेंटरमध्ये अपुऱ्या सोयी सुविधा असून याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार कोटेचा यांनी केला आहे.
त्यांनी स्वत: या सेंटरला भेट दिली. त्यानंतर धक्का बसल्याचे कोटेचा यांनी सांगितले. लोकार्पण झाल्यानंतर या ठिकाणी कोणतीही वैद्यकीय डॉक्टर्सची टीम उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या हॉस्पिटलमध्ये सिडकोने दिलेल्या आदेशानुसार ११ कोटी खर्च करत १५६० आयसोलेशन बेड, २१५ आय. सी. यू. बेड , ७५ डायलेसियस बेडची व्यवस्था ८ जून २०२०पर्यंत पूर्ण करायची होती. आज एका महिन्यानंतरही परिस्थिती 'जैथे थे' आहे. लोकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्याची किंमत भरमसाठ आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च केल्यानंतर देखील परिस्थिती न सुधारल्याने आता पैशांचा हिशेब भाजपाने मागितला आहे.