मुंबई- कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई महानगर पालिकेने उपनगरातील 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. पण, आता मात्र यातील 9 रुग्णालये ‘नॉन कोव्हिड’ करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. सोमवारपासून (दि. 20 जुलै) या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करुन घेतले जाणार नाही. मात्र, या नॉन-कोव्हिड रुग्णालयातील ओपोडी सुरू राहील आणि येथे आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोव्हिड सेंटर तसेच नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे आजार वाढतात. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एप्रिलपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तसेच उपनगरातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभासह 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. पण, आता रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याने तसेच कोव्हिड सेंटरच्या रुपाने मोठ्या संख्येने खाट उपलब्ध झाल्याने आता उपनगरातील 16 पैकी 9 रुग्णालयात सोमवारपासून कोरोना रुग्णांवर उपचार होणार नाहीत. सध्या या रुग्णालयात जे दाखल रुग्ण आहेत, तेच रुग्ण येथे राहतील. नवीन रुग्ण दाखल करुन घेतले जाणार नाहीत. मात्र, त्याचवेळी या रुग्णालयात कोरोना ओपीडी सुरू राहील. येथे आलेल्या कोरोना रुग्णाला बिकेसी, वरळी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये किंवा सायन, नायर, केईएममध्ये दाखल करण्यात येईल. तर सायन, केईएम आणि नायरमध्ये कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड दोन्ही रुग्णांवर उपचार राहतील. पण, अधिकाधिक रुग्णांवर आता कोव्हिड सेंटरमध्येच सामावून घेण्यात येणार आहे.
तसेच 9 रुग्णालयांसह 186 पैकी 160 डिस्पेन्सरी ही आता नॉन कोव्हिड करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता केवळ 26 डिस्पेन्सरी कोव्हिड असणार आहेत. तर 28 मॅटर्निटी होम्स (प्रसुतीगृह) पैकी आता केवळ 3 मॅटर्निटी होम्स कोव्हिड तर उर्वरित 25 नॉन कोव्हिड असतील.