मुंबई - महाराष्ट्र सरकार एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. `मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे.आता 30 जून रोजी लॉकडाऊन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून `मिशन बिगिन अगेन’च्या दुसर्या टप्प्याला 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यामुळे 30 जूननंतर सध्या असणारे निर्बंध यापुढे कायम असणार आहेत.
राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पावाले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसेच लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध आणण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना निर्बंध शिथिलीकरणाबाबत ठोस भाष्य करणे टाळले होते. त्यामुळे निर्बंधांबाबत अनिश्चितता कायम होती. गर्दीच्या आणि रुग्णसंख्या वाढीची भीती असलेल्या लाल क्षेत्रातील (रेड झोन) निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होतं. टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. “मंगळवार 30 जून रोजी टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. ‘राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील नियमांचे पालन आवश्यक -
सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहर्यावर मास्क घालणे बंधनकारक.
सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे (सोशल डिस्टन्सिंग) बंधनकारक.
दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
मोठया संख्येने लोकांना एकत्र जमता
येणार नाही. लग्नसमारंभाला परवानगी आहे. मात्र पाहुण्यांची संख्या 50 पेक्षा जास्त नसावी.
अंत्यविधीच्यावेळी सुद्धा 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
सार्वजनिक ठिकाणी दारु पिणे, पान आणि तंबाखू खायला मनाई आहे.
कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर आणि बाहेर निघण्याच्या मार्गावर थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल. तसेच हँड वॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.
कामावर मानवी संपर्क येणार्या प्रत्येक ठिकाणाची सतत स्वच्छता करावी लागेल.
कर्मचार्यांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कामावर असताना कर्मचार्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याची जबाबदारी प्रमुखाची असेल.
31 मे आणि चार जून 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार बिगर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.
मॉल आणि कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील.
मद्य दुकाने जिथे परवानगी आहे तिथे उघडतील. त्यासाठी आधीचेच नियम राहतील.
खासगी आणि सार्वजनिक बांधकाम साइट, मान्सूनकाळातील कामे करण्यास मंजुरी राहील.
रेस्टॉरंट/किचनला मान्यता. ऑर्डर होम डिलिव्हरी करावी लागेल. ऑनलाइन/ दूरशिक्षण याला मान्यता असेल.
सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती असावी.
सर्व खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील.
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी केवळ आवश्यक प्रवासासाठी उपलब्ध असेल. त्यात चालक + दोन जणच प्रवास करू शकतात. दुचाकीवर केवळ चालकाला परवानगी.
दुरुस्ती कामे करावीत.
सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी.
वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी असेल.
केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा.
जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवेस 50 टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी असेल.