मुंबईत वाढवलेल्या लोकलच्या फेऱ्या या सर्वसामन्यांसाठी नाहीत. तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या लोकलमधून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आयटी, जीएसटी, सीमा शुल्क, टपाल विभाग, राष्ट्रीय बँका, एमबीपीटी, कोर्ट, सुरक्षा आणि राजभवनाच्या कर्माचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असं जारी केलेल्या पत्रकातून रेल्वे स्पष्ट केलं आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व लोकल या विशेष लोकल आहेत आणि त्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत, असं रेल्वेने म्हटलं आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या लोकल धावणार आहेत. फक्त जलद स्थानकांवरच या लोकल थांबणार आहेत. ओळखपत्र दाखवल्यावर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाकरता प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन या अत्यावश्यक सेवातील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत आहेत. लॉकडाऊमुळे मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा बंद होती. पण १६ जूनपासून रेल्वेकडून विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येत आहेत. आता या विशेष लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लोकलमधून सुमारे सव्वा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. सव्वा लाख पैकी ५० हजार कर्मचारी पश्चिम रेल्वेवरून प्रवास करतील. राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या विशेष लोकल चालवल्या जात आहेत.