पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संबंधित पोलीस उपायुक्तांना परवानगीचे अधिकार
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील अधिकार आता संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आलेले आहेत.
पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.
मुंबई, पुणे संदर्भात विशेष काळजी
असे असले तरी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगरपालिका क्षेत्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसंदर्भात विशेष काळजी घेण्यात येत आहे.
जोपर्यंत संबंधित महानगरपालिका आयुक्त, त्यांच्या क्षेत्रातील कोरोनाबाधित प्रभागाची हद्द ठरवत नाहीत, तोपर्यंत या भागातून महाराष्ट्रात कोठेही जाता अथवा येता येणार नाही.
मात्र, या प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल.
अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह, मेडिकल प्रमाणपत्रासह, अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्यांची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल.