मुंबई - मुंबईत रोज शेकडो कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकाने उघडू नये असे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. नागरिकांकडून सुरक्षित अंतर न पाळणे, दुकानांमध्ये गर्दी करणे, लॉकडाऊनचे नियम न पाळणे यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
मुंबईत कोरोनाचे 9758 रुग्ण असून 387 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना देशभरात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा कालावधी वाढवताना लॉकडाऊनमधून काही शिथिथीलता देत अत्यावश्यक सेवे बरोबर अत्यावश्यक सेवा नसलेली एका रस्त्यावरील 5 दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
मात्र मुंबईत रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिकांकडून लॉकडाऊनचे नियम न पाळणे, दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करणे, सुरक्षित अंतर न पाळणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका आयुक्तांनी त्यांना दिलेल्या साथ नियंत्रण कायद्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही दुकाने चालू केली जाणार नाहीत असा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी काढले आहे.