मुंबई - मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. गुरुवारी आणखी ५७ नवे रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या २३८ वर पोहचली आहे. तर राज्यातील मृतांचा आकडा १९ झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने ज्या विभागात कोरोना संसर्ग रुग्ण आढळला आहे, ते विभाग सील केले आहेत.
मुंबई परिसरात कोरोनाचे संकट वाढते आहे. गुरुवारी २४ तासांत ५७ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली आहे. मुंबईतील झोपडपट्या, गावठाणे, चाळीत, सोसायट्यांत रुग्ण आढळून येत असून यातील काही परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आल्या नसल्याची धक्कादायक माहितीही समोर येते आहे. संसर्गाचा विळखा वसाहतींना बसायला सुरुवात झाली आहे. वरळी कोळीवाड्यात १० रुग्ण सापडल्यानंतर बुधवारी धारावीत एका रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी पालिकेच्या सफाई कर्मचा-याला कोरोना लागण झाल्याची नोंद झाली आहे. हा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रुग्ण सापडलेल्या वसाहतीचा परिसर सील करण्यात आला आहे. संसर्ग पसरू नये यासाठी वसाहतींवर यंत्रणेची २४ तास नजर असणार आहे. मुंबई महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.