मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित केले. यावेळी देशातील लॉकडाऊन आणखी १९ दिवसांसाठी म्हणजेच ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच सर्व राज्यांची मते लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. या घोषणेनंतर त्याचे पहिले पडसाद मुंबईत उमटले आहेत. परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक दिली. स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत होते. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक सध्या बंद आहे. रेल्वेसेवा ठप्प आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीपासूनच अन्य राज्यांतून रोजगारासाठी मुंबईत आलेले हजारो मजूर मुंबईत अडकून पडलेले आहेत. आज मध्यरात्रीनंतर किमान राज्यांच्या सीमा उघडतील वा इथे अडकलेल्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा अनेकांना होती. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्राने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवताना त्याची आणखी कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबले आहे. या घोषणेने आशा लावून बसलेल्या अनेकांची निराशा झाली. याच अस्वस्थतेतून वांद्रे स्टेशनबाहेर हजारो मजुरांनी अचानक धडक दिली. स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत होते. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान हे मजूर याठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आले. ते गाडीने आले की चालत आले, त्यांना कोणी आणले होते का याची चौकशी केली जात आहे. याबाबत साथ नियंत्रण कायदा आणि आय पी सी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे