संपूर्ण देशभरातील लॉकडाऊनचा आज १७ वा दिवस आहे. याकालावधीत मुंबई, पुणे या भागातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. तरीही चाचणी केल्याच्या तुलनेत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे. पाच आठवड्यामध्ये आतापर्यत फक्त १ हजार रूग्ण मुंबईत सापडलेत. तर २५ हजाराच्या आसापास चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातुलनेत ही संख्या कमीच आहे. त्यामुळे या आजाराचा एकही रूग्ण राज्यात मला नको असल्याने पुढील १५ दिवस लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकाने वर्क फ्रॉम होम सुरु करा. पुढील १५ दिवसात लॉकडाऊनमध्ये काय सुरु करायचे काय नाही, किती कामगार कामावर जातील, कारखाने सुरु करण्यासंदर्भात आदी गोष्टींबाबतची तयारी सुरु आहे. ही तयारी पूर्ण झाली की याबाबतची घोषणा १४ एप्रिलपर्यत वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी फारसे हताश, निराश न होता घरात बसून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन करत शेतीच्या कामासाठी यापूर्वीच लॉकडाऊनमधून सवलत देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जेव्हा जेव्हा संकट आले त्या संकटाचा सामना राज्याने धीरोदात्तपणे करून देशाला नव्हे तर जगाला महाराष्ट्राने दिशा दाखविली आहे. त्यामुळे या संकटाचा सामना आपण धीरोदात्तपणे असाच पुढे सुरु ठेवून कोरोनाला हरवू या असे आवाहन करत आजारावरून मला पक्षीय राजकारण नको आहे आज केंद्राबरोबर राज्य सरकार आहे, प्रत्येक राज्याबरोबर केंद्र सरकार आहे. त्यामुळे याप्रश्नांवरून कोणीही पक्षीय राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी भाजपाच्या नेत्यांना केले. तसेच पंतप्रधानांबरोबर आज झालेल्या व्हिडीओ काँन्फरसिंगची माहिती देत देशातील सर्वच राज्यांनी लॉकडाऊन वाढीसंदर्भात सकारात्मकता दाखविल्याचे त्यांनी सांगितले.