अनेक सेवाभावी संस्थांनी जागोजागी अडकून पडलेल्या लोकांना अन्नधान्य आणि जेवणाचे वाटप करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे. मात्र यापैकी काही लोकं केवळ फोटोंसाठी आणि एखाद्या हेतूने अशा ठिकाणी गोष्टींचे वाटप करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आणि सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अनेक फोटो दिसून येत आहे. अडकून पडलेले मजूर, गरीबांना हे लोक अन्नधान्य तसेच जेवणाची पाकिटे वाटताना या फोटोमध्ये दिसून येत आहे. मात्र काही वेळा केवळ फोटो काढण्यासाठी आणि विशिष्ठ उद्देशाने अशा ठिकाणी लोकं जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. म्हणून राजस्थानमधील अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वास मोहन शर्मा यांनी मदतकार्या दरम्यान फोटो काढण्यावर बंदी घातली आहे. गरजू लोकांना अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटे वाटताना फोटो काढणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अजमेरमध्ये एका ठिकाणी तर आठ जणांनी गरीबांना दोन केळ्यांचे वाटप करतानाचे फोटो पोस्ट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर अन्य एका घटनेमध्ये एका सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गायीला गवत खायला घालतानाचे फोटो काढले. इतकच नाही हे फोटो स्थानिक वृत्तपत्रामध्ये छापून आले होते. त्याचबरोबर काही लोकांना रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्कीटे खाऊ घातल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड केल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकजण अशाप्रकारे फोटो काढताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळेच आता पोलिसांनी यासंदर्भात सूचना जारी केल्या असून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करुन मदतकार्याचे फोटो आणि सेल्फी काढणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.