देशात आर्थिक आणीबाणी लागू शकते - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 April 2020

देशात आर्थिक आणीबाणी लागू शकते - प्रकाश आंबेडकर



मुंबई - जागतिक पातळीवर आर्थिक मंदी आली असून येत्या मे महिन्यात कधीही आर्थिक आणीबाणी भारतात लागू शकते, 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती असल्याने सर्वजण आंबेडकर जयंती तसेच महात्मा ज्योतिबा फुले जयंती घरीच साजरी करतील अशी आशा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

भारतासह जगात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर अद्यापही योग्य ते उपचार मिळालेले नाहीत. मात्र कोरोनाला थांबवण्यासाठी सरकारला जे पर्याय सुचले आहेत, त्या पर्यायाचा वापर केला जातोय. लॉक डाऊन हा त्यापैकीच एक पर्याय आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला जे काय सहकार्य पाहिजे आहे ते सहकार्य आम्ही द्यायला तयार आहोत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. इस्लामपूरा येथे अचानक 25 कोरूना बाधित रुग्ण आढळून आले. इस्लामपुरामध्ये कोरोनाचा जो पहिला रूग्ण होता तो काही दिवसांपूर्वी हज यात्रा करून आला होता. त्याला तपासणी न करता इस्लामपूराला जाऊ द्यावे, यासाठी सरकारमधील एका मंत्र्याने फोन केला होता, त्या मंत्र्यांचे नाव प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले नसले तरी त्या व्यक्तीने इस्लामपुरा मध्ये कोरोना पसरविला, ही अतिशय गंभीर बाब आहे, म्हणजेच काय तर नियम तुम्हीच बनवायचे आणि तुम्हीच तोडायचे हे योग्य नसल्याचे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

येत्या महिन्यात शेतीचे काम सुरु होणार असून सरकारने शेतकऱ्यांचा सर्व माल ताब्यात घेऊन त्याची त्यांना पावती द्यावी, त्या पावतीच्या आधारे त्यांना बँकेतून पैसे वितरित करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. ज्यांचे हातावर पोट आहे,त्यांचाही सरकारने विचार करावा. लोकांमध्ये आत्मविश्वास वाढावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी टाळ्या,ताट वाजविण्याचे आवाहन केले होते, ते योग्य होते. मात्र मेणबत्ती लावण्याचा कार्यक्रम हा केवळ टीआरपी साठी करण्यात आला होता. देशात आर्थिक मंदी चालू असून मे महिन्यात कधी ही आर्थिक आणीबाणी लागू शकते. ही गंभीर बाब असून भारताकडे फार्मासिटिकल्स कंपन्या आहेत तरीही औषध निर्मितीतील नेतृत्व भारताला घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकांच्या आरोग्यासाठी लॉकडाऊन वाढला पाहिजे या मताचा मी आहे, यासाठी शासनाला आपले सहकार्य असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Post Bottom Ad