मुंबई -- महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोमवारी मुंबई परिसरातील आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईत १, नवी मुंबई दोन, कल्याणमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईत ६, मुंबईबाहेर ८ अशी महामुंबईत एकूण रुग्णांची संख्या आता १४ वर पोहचली आहे. यामध्ये शनिवारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेल्या कल्याणच्या रुग्णाची पत्नी (३७) आणि तीन वर्षीय मुलीला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे राज्यासह मुंबईतही झपाट्याने पसरत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. राज्यभरात रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून कठोर पावले उचलली आहेत. मुंबईत जमावबंदी केली आहे. गरज नसताना गर्दी करू नये असे आवाहनही केले आहे. पालिका, राज्य सरकारच्या डॉक्टरांच्या माध्यमातून विमानतळावर परदेशात आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. करण्यात आलेल्या तपासणीनंतर ४९८ संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ४५२ रुग्ण निगेटिव्ह आहेत. सोमवारी सकाळपर्यंत २० रक्ताचे नमुने तपासले. त्यात मुंबईत १, नवीमुंबईत २, कल्याण २ असे ५ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या १४ वर पोहचली आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांच्या निकट असलेल्यांना याची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शनिवारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेल्या कल्याणच्या रुग्णाची पत्नी आणि तीन वर्षीय मुलीला ‘कोरोना’ची लागण झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांचे निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन प्रकारातून सध्या भारतात कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे जे परदेशातून प्रवास करून मुंबईत आले आहेत त्यांनी व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्तींनी घरातच एका वेगळ्या खोलीत १४ दिवस थांबावे. मधुमेह, रक्तदाब तसेच गरोदर महिलापासून लांब राहावे. १४ दिवसांत किंवा नंतर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे डॉ. शाह यांनी सांगितले.
कस्तुरबा’त ६५ जण देखरेखीखाली -
कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीत आतापर्यंत १८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४३३ संशयितांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कस्तुरबात एकूण ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कस्तुरबात स्वच्छता राखण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्देशानुसार ‘टोटल क्लिनिंग एजन्सी’ची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी. अफवा पसरवू नयेत, अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
रिस्क प्रोफाईल कमिटीची स्थापना -
पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून रुग्णांची विभागणी करण्यासाठी ‘रिस्क प्रोफाईल तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तीव्र लक्षणे असलेल्या ‘ए’ कॅटेगरीतील रुणांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ‘बी’ कॅटेगरीतील सौम्य लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ‘कोरोना’ बाधित देशातून प्रवास करून आलेल्या आणि अत्यंती सौम्य लक्षणे दिसलेल्या संशयितांना घरी पाठवण्यात येत आहे. त्यांच्यावरही देखरेख पालिकेच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
सेव्हन हिल्समध्ये २४ डॉक्टरांची टीम तैनात -
पालिकेच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ११ रुग्ण देखरेखखाली आहेत.