राज्यात कोरोनाचे ९ नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या २६ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2020

राज्यात कोरोनाचे ९ नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या २६


मुंबई - राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता २६ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी मधून भारतात येतील त्यांना १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशा एकूण ४ प्रवाशांना काल क्वारंटाईन करण्यात आले. यापैकी एकाला पुण्यात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून इतर तिघांना मुंबईत क्वारन्टाईन करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जे नऊ नविन रुग्ण आज आढळले त्यातील ४ जण हे पुणे येथील पहिल्या २ बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी १ रुग्ण अहमदनगरला, २ यवतमाळला तर १ जण मुंबईत भरती आहे. या चौघांशिवाय मुंबईत आणखी ४ जण करोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.

मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण यांचा अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाईन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे भरती असलेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक रुग्ण करोना बाधित असल्याचा अहवाल आज इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे.

आज करोना बाधित आढळलेल्या ९ रुग्णांपैकी १ महिला आहे. राज्यात आज १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.  

१४ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४९४ विमानांमधील १ लाख ७३ हजार २४७ प्रवासी तपासण्यात आले आहेत.

राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ९४९ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ६६३ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ५३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १७ जण पुणे येथे तर ७२ जण मुंबईत भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे १६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे ९ आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे ३ संशयित रुग्ण भरती आहेत.

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ 
टोल फ्री क्रमांक १०४

Post Bottom Ad