नवी दिल्ली : पूर्ण देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला २२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यु'साठी आवाहन केलं. नागरिकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असं सांगतानाच 'आवश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडावंच लागेल' याचीही जाणीव पंतप्रधान मोदींनी करून दिली. पण अशाच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी एक अनोखं आवाहन नागरिकांना केलंय.
२२ मार्च रोजी मला तुमच्याकडून आणखी एक सहकार्य हवंय. गेल्या दोन महिन्यांपासून लाखो जण रुग्णालय, कार्यालय, रस्त्यारस्त्यावरील गल्ल्यांत आपलं काम चोखपणे बजावत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, रुग्णालयाचे कर्मचारी, एअरलाईन्सचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मीडिया कर्मचारी, रेल्वे, बस, ऑटो सुविधा पुरवणारे, डोम डिलिव्हरी करणारे अशा अनेक जणांचा समावेश आहे. हे लोक करोना संक्रमणाचा धोका पत्करत दुसऱ्यांना सेवा पुरवत आहेत, आपलं कर्तव्य निभावत आहेत, असं म्हणत मोदींनी नागरिकांना या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली.
करोनासारख्या आपत्तीवेळी हेच लोक देशाची शक्ती बनून लढत आहेत. देशातील अशा सर्व छोट्या मोठ्या व्यक्तींचा आणि संघटनांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. २२ मार्च रोजी रविवारी आपण अशाच लोकांना धन्यवाद अर्पण करू, असं सांगताना ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची हेदेखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
रविवारी, अर्थात जनता कर्फ्युच्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजता आपण आपल्या घरांच्या दरवाज्यात, खिडक्यांत, बाल्कनीमध्ये उभं राहून ५ मिनिटं अशा व्यक्तींचे आभार मानू. हे आभार प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून, घंटी वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
यावेळी, पंतप्रधानांनी स्थानिक प्रशासनालाही आग्रह केला. '२२ मार्च रोजी ५ वाजता सायरन वाजवून याची सूचना लोकांपर्यंत पोहचवावी. सेवा परमो धर्म: च्या आपल्या संस्कारांना मानणाऱ्या अशा देशवासियांसाठी आपल्याला संपूर्ण श्रद्धेसोबत भाव व्यक्त करायला हवेत' असं आवाहन मोदींनी नागरिकांना केलं. तसंच आपल्या अत्यावश्यक सेवा, रुग्णालय यांच्यावर दबाव वाढणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, असंही मोदींनी म्हटलं.
दरम्यान, 'मी आज प्रत्येक देशवासियाकडे आणखीन एक समर्थन मागतोय. हे समर्थन असेल जनता कर्फ्युसाठी... अर्थात जनतेनं जनतेसाठी लावलेला कर्फ्यु... या कर्फ्युदरम्यान कोणत्याही नागरिकानं घराबाहेर पडू नये... २२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यु' आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पालनचा संकल्पतेचा एक प्रतिक असेल' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना 'जनता कर्फ्यु'चं पालन करण्याचं आवाहन केलं.
अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड १९ इकॉनॉमिक टास्क फोर्सची स्थापना आणि 'जनता कर्फ्यु'ची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या 'देशाच्या शक्ती'बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन केलं आहे