मुंबई, दि 19 : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून तरी नियंत्रणात ठेवली आहे मात्र आणखीही शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्र या संकटावर मात करेल. मी स्वत: आज देखील पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल हे सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितले. जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
गर्दी पूर्ण बंद करा -
मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांनी सरकार ज्या ज्या सुचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आमच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र तरी देखील आपण गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे. आपण शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तरीसुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, सूचनांचे आणखी काटेकोर पालन केले पाहिजे.
आपण ज्या उपाययोजना करीत आहोत त्या समाधानकारक असल्या तरी विषाणू एकेक पाउल पुढे टाकत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. यंत्रणेमध्ये काम करणारीही माणसेच आहेत. त्यांच्यावरचा भार वाढेल असं कृत्य आपल्याकडून व्हायला नको.
होम क्वारंटाईन व्यक्तींनी फिरू नये -
आज सर्वच रुग्ण बाहेरून लागण झालेले आहेत. बाहेरची लोकं देखील आपलीच आहेत, नातेवाईक आहेत. मात्र त्यांनी इथे येतांना सर्व काळजी घेऊन येणे महत्वाचे आहे. होम क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातांवर शिक्के मारले आहेत, त्यांनी देखील आसपास वावरू नये. आपल्या परदेश प्रवासाची माहिती लपवून प्रवास करू नका.
हे विषाणुशी युद्ध -
युद्ध हे जिद्दीने लढायचे असते आणि जिंकायचे असते, अनेकांनी 1965 आणि 1971 चे युद्ध पाहिले असावे, अनुभवले असावे. युद्धाचा अनुभव वाईट असतो. युद्धानंतरची परिस्थिती वाईट असते. देशासाठी छातीचा कोट करून आपले जवान लढतात, धारातीर्थी पडतात. कोरोनाशी ज्या पद्धतीने लढतो आहोत त्यावरून मला 1971 चे युद्ध् आठवते. आजचे युद्ध हे विषाणुशी युद्ध आहे. “वॉर अगेंस्ट व्हायरस.” युद्ध सुरु झाले आहे.
आपले जवान म्हणजे आपले डॉक्टर, नर्सेस, बसचे चालक, स्वंयसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. आपण त्यांना घरी राहून सहकार्य करू शकत नाही का?
संकट हे काही जात, पात,धर्म पाहून येत नाही. आपण एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपलं काहीही वेडवाकडं करू शकत नाही, शकणार नाही. चीनमध्ये या विषाणुचा पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळला पण आता चीनने अनेक कडक उपाययोजना केल्यामुळे यातून ते बाहेर पडत आहेत. आपल्याला ही बाहेर पडायचे आहे. त्याकरिता पुन्हा एकदा सहकार्य करा, आपण नक्की या संकटातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.