मुंबईत आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या २१ वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2020

मुंबईत आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या २१ वर


मुंबई - महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मुंबईत शुक्रवारी आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यातील दोन मुंबईतील व एक कल्याणमधील आहे. त्यामुळे मुंबईत ११ व मुंबईबाहेर १० असे महामुंबईत एकूण २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपअधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरु असून आतापर्यंत ५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रोज रुग्णांची संख्या वाढते आहे. शुक्रवारी मुंबईत दोन व कल्य़ाणमधील एक असे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. यातील मुंबईतल्या रुग्णापैकी एक पुरुष रुग्ण ६२ वयाचा असून तो १४ मार्च रोजी युके मधून मुंबईत आला. त्याच्यामध्ये लक्षणे असल्याने १८ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला मधुमेह, कर्करोग, हायब्लडप्रेशर असे आजार आहे. तर दुसरा ३८ वयाचा पुरुष रुग्ण असून तो १४ मार्च रोजी तुर्कीमधून मुंबईच्या घरी आला. त्यानंतर १८ मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर कल्याणमधला ६३ वयाचा रुग्णही पुरुष असून तो दुबईहून प्रवास करून कल्याणमधील घरी आला होता. लक्षणे असल्याचे आढळल्याने १९ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिन्ही रुग्णांचे चाचणी रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. दरम्यान, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु असल्याचेही शहा यांनी सांगितले.
शुक्रवारी कस्तुरबा रुग्णालयात ५४० रुग्ण तपासणीसाठी आले. ११४ रुग्ण संशयित आढळले. ८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १२७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. परदेशातून येणा-या प्रवाशांची तपासणी केली जात असून त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेतला जातो आहे. लक्षणे आढळल्य़ास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. दरम्य़ान ज्यांना होम क्वारेंन्टाईन केले जाते आहे, त्यांनी १४ दिवस घरातच थांबावे. इतरांचा संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

येथेही आयसोलेशन वॉर्ड व ओपीडी सुरु -
बांद्रा भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी या तीन रुग्णालयातही शुक्रवारपासून आयसोलेशन वॉर्ड व ओपीडी सुरु करण्यात आले आहेत. राजावाडी रुग्णालयात २५ बेड, कुर्ला भाभा १०, वांद्रे भाभा १० असे एकूण ४५ बेडस सुरु करण्यात आले आहेत.

केईएममध्ये लॅब सुरु -
कोरोना चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात लॅबची सुविधा आहे. आता ही सुविधा केईएममध्येही उपलब्ध होणार असून शुक्रवार पासून सुरु करण्यात आली आहे. तसेच खासगी लॅबना अद्याप हिरवा कंदिल मिळालेला नाही. मात्र येथेही सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

खासगी रुग्णालये व हॉटेलमध्ये रुग्णांसाठी सवलत -
रुग्ण वाढत असल्याने मुंबईतील खासगी रुग्णालये व हॉटेलमधील क्वारेन्टाईनसाठी रुग्णांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना येथेही क्वारेन्टाईन करता येणार आहे.

Post Bottom Ad