मुंबई, दि. १७ : ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, औषध विक्रेत्यांनी विनाकारण त्याचा साठा करून ठेऊ नये असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. राज्यांत उद्भवलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख औषध उत्पादक आणि वितरक यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.
यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे, ऑल इंडिया केमिस्ट असोशिएशन चे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, सध्या सॅनिटायजर आणि मास्क यांची मागणी वाढली आहे. तेव्हा ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या दुकानात मुबलक प्रमाणात चांगल्या दर्जाचे उत्पादन ठेवा आणि योग्य किंमतीतच ते विका अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हात साबणाने धुवा, स्वच्छता राखा, सर्दी खोकला किंवा आजारपणाचे लक्षणं वाटत असतील तर तपासणी करून घ्या. स्वत:ला इतरांपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी -
सॅनिटायजर आणि मास्क याचा काळाबाजार होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी औषध विक्रेत्यांची बैठक संपल्यानंतर प्रत्यक्ष केमिस्ट स्टोअरवर जाऊन पाहणी केली. तिन बत्ती चौक मलबार हिल भागातील दोन दुकानांत त्यांनी अचानक भेट दिली . या दुकानात सॅनिटायजर, मास्क उपलब्ध आहेत का? ते योग्य दरात विकले जाते आहे काय याची प्रत्यक्ष चाचपणी केली. या दुकानात उपलब्ध सॅनिटायजरमधील घटक योग्य असल्याचे तपासले. ग्राहकांना दिलेल्या बिलावरील रक्कम एमआरपी पेक्षा जास्त तर नाही याची देखील त्यांनी खात्री केली. यावेळी अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सोबत होते.