रेल्वे, बसेसमध्ये प्रवाशी क्षमता कमी करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2020

रेल्वे, बसेसमध्ये प्रवाशी क्षमता कमी करणार - मुख्यमंत्री


मुंबई, दि.18 : कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळाल्यासच ते शक्य होईल. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी इतर पर्यायी बसेस वापरण्यात येतील.

दुकानांच्या वेळा ठरविणार -
शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी व दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

साधनसामुग्रीची उपलब्धता -
दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल.

जीवनावश्यक वस्तुंचा साठा करू नये -
जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Post Bottom Ad