· चाचणी केंद्रे वाढल्याने पॉझेटिव्ह रुग्ण वाढले, पण बरे होऊन घरी जाणारे रुग्णही आहेत
· शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही
· एसी न लावण्याचे, थंड पेय आणि पाणी न पिण्याचे आवाहन
· जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा नाही.
· विषाणूशी लढणारे डॉक्टर योद्धेच
· संयम, जिद्द आणि आत्मविश्वासावर युद्ध जिंकण्याचाही विश्वास
मुंबई दि. ३१: राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सावध व्हावे, गर्दी टाळावी असे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू असा विश्वास राज्यातील जनतेला दिला. आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते
अन्नधान्य वितरणाची साखळी व्यवस्थित सुरु
लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करताना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची अजिबात कमी नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही
महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना संकटापाठोपाठ आर्थिक संकट येऊ नये, राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हे वेतन टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे पहिल्यांदा दिले जातील, त्यामुळे वेतन कपात होईल ही भीती कुणीही मनात बाळगू नये, गैरसमज करून घेऊ नये.
धोका आहे, काळजी घ्या
रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब
राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत. धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये, गर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते, त्या देशातून जे नागरिक- पर्यटक आले, त्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे. लक्षणे आढळली तर पटकन उपचार करून घ्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हेही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे सांगितले.
थंड पेय, थंड सरबत यापासून दूर राहा
मुख्यमंत्र्यांनी खाजगी डॉक्टरांना दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा. परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका असेही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वातानुकूलन यंत्रणा (एसी) न लावण्याची सूचना केली. तसेच थंड पाणी, थंडपेय, थंड सरबत यापासून थोड्या काळासाठी दूर राहा, ॲलर्जी टाळा, साधं पाणी प्या, यामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी पडशासारखे आजार तुम्ही दूर ठेऊ शकाल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
१ हजार केंद्रात दोन लाख स्थलांतरितांना सुविधा
संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असल्याने इतर राज्यातील कामगार, मजूर यांनी स्थलांतर करणे ताबडतोब थांबवावे असे सांगितले असूनही लाखो लोक स्थलांतर करताना दिसत असल्याबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासाठी राज्यात जवळपास १ हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, तर आजघडीला दोन- सव्वादोन लाख स्थलांतरीत लोक, मजूर यांची तिथे व्यवस्था करण्यात आली आहे, इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगार-मजुरांचीही ती राज्ये व्यवस्था करत आहेत, प्रत्येकजण माणुसकीचा धर्म पाळत आहेत, त्यांना अन्न, औषधे याचा पुरवठा केला जात आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गणवेशधारी डॉक्टर हे योद्धेच
नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस शी आपण बोललो, त्यावेळी ते गणवेशधारी योद्ध्यासारखे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर, एसटीचे ड्रायव्हर, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, या सगळ्यांचे मला खुप कौतुक वाटते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला.