मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसने आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हे रुग्ण दुबईहून प्रवास करून आलेल्या रुग्णांसोबतचे सहप्रवासी आहेत. मुबईतील कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने हे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निर्वाळा दिला आहे. तर चार रुग्ण निगेटिव्ह आहेत. त्यामुळे राज्यातील करोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता सातवर पोहचली आहे.
दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी करोना बाधित असल्याचे आढळल्यानंतर मागील दोन दिवसांपासून त्यांच्या निकटवर्तीयांचा शोध घेणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णासोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासीही कोरोना बाधित असल्याचे आढळले आहेत. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोग शाळेत त्यांची तपासणीनंतर ते कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १९९५ विमानांमधील १,३८,९६८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर परदेशातून येणा-या सर्व प्रवाशांची तपासणी या तीन विमानतळावर केली जाते आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकेकडून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्व्हेक्षणातून घेतला जातो आहे. इराण, इटली, आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला दिली जाते आहे. या तीन देशातून येणा-या करोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे २१ फेब्रुवारीनंतर सर्व प्रवाशांची तपासणी केली जाते आहे. दुबईहून आलेल्या पुण्यात करोना बाधित दोन रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णांच्यासोबत सहप्रवास करणा-या प्रवाशांचा शोध युध्द पातळीवर सुरु करण्यात आला होता. त्यात मुंबईतील दोन प्रवासी कोरोना बाधित आढळल्याने यंत्रणांची धावपळ उडाली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात सहा संशयित कोरोना रुग्णांपैकी दोन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या चार जणांना तीन दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाणार असून १४ दिवस निगराणीखाली ठेवले जाणार आहे.
मुंबईकरानो घाबरू नका, पालिका सज्ज -
मुंबईकरानो घाबरू नका. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करा. कस्तुरबा रुग्णालयात सर्व यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाचे दोन्ही रुग्ण पुणे आणि साऊदी येथे जाऊन आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. इतर लोकांना याची बाधा होऊ नये म्हणून पालिका सज्ज आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कब्बडीच्या महापौर चषक स्पर्धा रद्द केल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील दोन्ही रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.