मुंबईत रविवारी एकही कोरोनाचा नवा रुग्ण नाही, रुग्णांची संख्या ९ वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2020

मुंबईत रविवारी एकही कोरोनाचा नवा रुग्ण नाही, रुग्णांची संख्या ९ वर


मुंबई - राज्यभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढले असले तरी रविवारी मुंबईत एकही नवा रुग्ण आढळला नाही. तपासण्यात आलेल्या ४३ रक्ताच्या नमुन्यांमध्ये सर्व निगेटिव्ह आहेत. त्यामुळे मुंबईतील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ५ व नवी मुंबई, ठाणे ४ असे एकूण ९ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपकार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी दिली.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसने राज्यासह मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत एकूण ४५८ संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यातील ३८० रुग्ण कोरोना निगेटिव्ह आले आहेत. रविवारी दिवसभरात ४३ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे रविवार मुंबईकरांना दिलासा देणारा ठरला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यसरकार व मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज असून परदेशातून येणा-या पर्यटकांची तपासणी करण्यासाठी विमानतळावर डॉक्टरांची टीम २४ तास तैनात करण्यात आली आहे. विमानतळावर आतापर्यंत २ लाख ३० हजार परदेशातून मुंबईत आलेल्या पर्यटकांची तपासणी करण्यात आली. यातील १५ मार्चपर्यंत ४५८ संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी रविवारी १० हजार गृहनिर्माण सोसायट्या तपासण्यात आल्या. डॉक्टरांच्या टीमने सोसायटीतील पदाधिका-यांसोबत बैठक घेऊन त्यांना कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शन केले. जनजागृतीपर पत्रके, पोस्टर्स वाटप करण्यात आल्याची माहिती दक्षा शाह यांनी दिली.

अशी काळजी घ्यावी --
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांचे निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन प्रकारातून सध्या भारतात कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे जे परदेशातून प्रवास करून मुंबईत आले आहेत त्यांनी व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्तींनी घरातच एका वेगळ्या खोलीत १४ दिवस थांबावे. मधुमेह, रक्तदाब तसेच गरोदर महिलापासून लांब राहावे. १४ दिवसांत किंवा नंतर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे डॉ. शाह यांनी सांगितले.

कस्तुरबात लॅबची क्षमता वाढली-
कस्तुरबाच्या लॅबची क्षमता वाढवली असून आता संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने २४ तास तपासले जाणार आहेत. या रुग्णालयाची आतापर्यंत ८० बेडची क्षमता होती. रविवारपासून या बेडची क्षमता वाढून १०० झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या याहून अधिक वाढली तर अशा रुग्णांना पालिकेच्या कुर्ला आणि वांद्रे येथील भाभा, राजावाडी आणि बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेन्टरमध्ये बेड तयार ठेवण्यात आले आहेत.

४ दिवसात ‘केईएम’ची लॅब सुरु होणार -
पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयातही कोरोनाची चाचणी करण्यात केली जाणार आहे. येत्या चार दिवसात केईएम मधील लॅब सुरु होणार आहे. या ठिकाणी पालिकेची अ‍ॅम्ब्युलन्स तैनात ठेवण्यात येणार आहे.

रविवारी १० हजार सोसायट्यांमध्ये तपासणी -
कोरोनाची जनजागृती आणि तपासणी करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून आज रविवार असतानाही पालिकेच्या १०६७ जणांच्या टीमने मुंबईतील २४ विभागात जाऊन १० हजार सोसायट्यांमधील लोकांची तपासणी केली. यात डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

परदेशवारीमुळे कोरोनाची थेट लागण --
कस्तुरबात आढळलेल्या ९ रुग्णांपैकी ८ जणांना परदेशी वारीत कोरोनाची लागण झाली आहे तर केवळ एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग त्याच्या जवळच्या नातेवाईकामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनाची थेट लागण होण्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. योग्य ती काळजी घ्यावी, योग्य झोप, आहार घ्यावा. स्वच्छता पाळावी. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा बसेल, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

Post Bottom Ad