मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून मंगळवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता चार झाली आहे. रुग्णांची संख्याही वेगाने वाढते असून मंगळवारी मुंबईत आणखी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ५८ वर पोहचली आहे. दरम्यान एकीकडे चिंता वाढत असताना दुसरीकडे ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्या ने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश आले आहे.
कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रविवारी मुंबईत कोरोनाचा दुसरा मृत्यू झाल्यानंतर सलग सोमवारी आणि मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यापूर्वी १७ मार्च रोजी पहिला मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईतील मृतांची संख्या आता चार झाली आहे. रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढते असून मंगळवारी ५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महामुंबईतील रुग्णांची संख्या आता ५८ वर पोहचली आहे.
मंगळवारी मृत्यू झालेल्या ६५ वर्षीय रुग्ण दुबईत वास्तव्यास होता. हा रुग्ण युएई येथून प्रवास करून १५ मार्चला अहमदाबाद व नंतर २० मार्चला मुंबईत आला. २३ मार्चला खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णाला उच्चरक्तदाब तसेच अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निदान झाले होते. प्रकृती गंभीर होती. सोमवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मंगळवारी ८४१ रुग्ण तपासणीसाठी ओपीडीत आले होते. त्यातील ९४ संशयित रुग्ण आढळले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एका रुग्णाचा मृत्यू झाला. १२८ जणांना दाखल करून घेण्यात आले आहे. तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपअधिकारी दक्षा शाह यांनी दिली.