महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.
हेलपाटे मारावे लागले का ? -
या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का..किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकासाठी कर्ज घेतले होते. आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या आता केवळ एका थम्बवरच काम झाले’असे त्यांनी सांगितले.
लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा -
परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्यानं चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीचं लग्न जमलंय अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिलं अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रणही दिले.
योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील बळीराजाला कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसांत झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना राबविताना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संयम ढळू देऊ नका बळीराजाला दुखावू नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.
कर्जमुक्तीसाठी योजना- उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात राहावा त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा -
यावेळी अमरावती येथील सुरेश कोटेकर, सरीता गाढवे, बाबाराव दामोदर यांच्याशीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. योजनेंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. आज १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. तसेच १५ दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरीक्षण झाले आहे. योजनेची सर्व अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याला नोंद पावती दिली जात आहे.