मुंबई - महापालिकेने चार वर्षांपूर्वी चित्रपटगृहे व रंगभूमी करवाढ प्रस्तावित केली होती. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय न घेतल्यामुळे पालिकेने रंगभूमी कर वसूलीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पूर्वीप्रमाणेच मराठी आणि गुजराती नाटक, एकपात्री नाटक, तमाशाला करातून वगळले जाणार आहे.
मुंबई महापालिकेने २०१५ मध्ये रंगभूमी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्तावही राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला. प्रस्तावात तीन ते सहा रुपये कर वाढीनुसार करमणुकीचे पाच प्रकार निश्चित केले आहेत. त्यानुसार वातानुकूलित चित्रपटगृहात प्रत्येक खेळासाठी ६२ वरून ६६ रुपये, विनावातानुकूलित चित्रपटगृहाचा कर प्रत्येक खेळासाठी ४७ वरून ५० रुपये तर सर्कस व आनंद मेळ्यासाठी प्रतिदिन ५० वरून ५५ रुपये कर प्रस्तावित आहेत. नाटक, जलसा, करमणुकीचे अन्य कार्यक्रम यांच्या करात प्रत्येक खेळासाठी २६ वरून २८ रुपये वाढ सूचवली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. यंदा २०२०-२१ मध्येही रंगभूमीचे जुनेच दर 'जैसे थे' ठेवले जाणार आहे. मराठी, गुजराती नाटक, एकपात्री नाटक आणि तमाशा यांना मात्र यातून वगळण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या पटलावर यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे.
असे असतील दर
- वातानुकूलित चित्रपटगृह - प्रतिखेळ ६६ रुपये
- विनावातानुकूलित प्रतिखेळ - ५० रुपये
- नाटक व अन्य करमणुकीचे कार्यक्रम - प्रतिखेळ २८ रुपये
- सर्कस, आनंद मेळा - प्रतिदिन ५५ रुपये
- इतर कोणतेही करमणूक - प्रतिखेळ ३३ रुपये