इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी टॅब देण्यात आले. यांतील बहुसंख्य टॅब नादुरुस्त तर काही टॅबना मेमरीकार्डच नसल्याने ते वापराविना पडून आहेत. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी मुलांच्या हातात हे टॅब पोहचलेले नाहीत. कोट्यवधीटे टॅब धूळखात पडून असताना आता येत्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीतील मुलांसाठी नवीन टॅब खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने पालिकेकडून २७ शैक्षणिक वस्तू दिल्या जात आहेत. सन २०१५-१६ ला २२ हजार टॅबचे वाटप करण्यात आले. त्यानंतर २०१७ मध्ये १३ हजार टॅब घेतले जाणार होते. त्यानंतर ८ वी ते दहावीच्या मुलांना टॅब खरेदी करण्यात आले. मात्र ते अल्पावधितच नादुरुस्त झाले. तर काही टॅबमध्ये मेमरीकार्डच नसल्याने ते बंद अवस्थेत पडून होते. यावरून शिक्षण समितीत वाद रंगला होता. टॅब खरेदीवर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले. मात्र नादुरुस्त टॅब शैक्षणिक वर्ष संपत आले तरी दुरुस्त झाले नाहीत. तर काही टॅबमध्ये मेमरी कार्ड नसल्याने अभ्यासक्रम टॅबमध्ये टाकता आलेला नाही. त्यावर प्रशासनाकडून खर्च करावा लागणार आहे. हा खर्च फुकट जाणार असल्याने नव्याने टॅब खरेदी केले जाणार आहेत.
सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टॅब --
आतापर्यंत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले जायचे. आता सहावी पासून दहावी पर्यंत टॅब दिले जाणार आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षासाठी करार केला जाणार असून कंत्राटदार कंपनीला दरवर्षी अभ्यासक्रम त्यात बदलून द्यावा लागणार आहे. सहावी पासून दहावी पर्यंत हे टॅब विद्यार्थ्यांना वापरावे लागणार असल्याने विद्यार्थी त्याचा चांगला वापर करतील तसेच पाच वर्षांचे कंत्राट केले जाणार असल्याने टॅबमध्ये बिघाड झाल्यास ते कंत्राटदाराला बदलून किंवा दुरुस्त करून द्यावे लागणार आहेत असे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.