सावित्रीच्या लेकींचा ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेत सहभाग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2020

सावित्रीच्या लेकींचा ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेत सहभाग


मुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील महिला, युवतींसाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील 34 जिल्ह्यात व 10आयुक्तालयात एकूण 150 ठिकाणी आयोजित कार्यशाळेत हजारो महिला, महाविद्यालयीन युवती तसेच शालेय विद्यार्थीनींनी सहभाग घेतलाआणि इंटरनेट व समाजमाध्यमाचा सुयोग्य वापर करण्याचा दृढ संकल्प केला.

महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व या संदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी आज एकाच दिवशी राज्यभर ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. या मोहिमेत 12 जिल्ह्यात विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

सायबर गुन्हे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक, लैंगिक अत्याचार, विवाहविषयक वेबसाईटवरून होणारी फसवणूक आदींबाबत महिला व तरुणींना माहिती व्हावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात 150 ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. इंटरनेट वापरताना, फोटो अपलोड करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, महिला सुरक्षाविषयक कायदे या विषयावर सायबर विषयातील तज्ज्ञ, सायबर पोलीस अधिकारी, महिला दक्षता समिती सदस्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या तज्ज्ञांना उपस्थित शालेय विद्यार्थिनी व तरुणींनी विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.

Post Bottom Ad