चिनमध्ये ज्या भागात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे, त्या भागातून आलेले हे संशयित रुग्ण आहेत. यातील दोघेजण १६ जानेवारीला चिनला गेले होते. २२ जानेवारीलाला मुंबईत आले. तर १ जानेवारीला हॉंगकॅांगला गेलेला एकजण ९ जानेवारीला मुंबईत परत आला. चिनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर या देशातून येणा-या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. २३ जानेवारीपर्यंत १७३९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हे तीन रुग्ण संशयित आढळले. ते पालघऱ जिल्ह्यातील वसई, विरार भागातील आहेत. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टि्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल उद्या मिळणार आहे. राज्यातील आरोग्य खात्याने कस्तुरबा रुग्णालयात २८ दिवस देखरेखेखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशा रुग्णांसाठी कस्तुरबातील चार विशेष वॅार्ड विशेष तयार करण्यात आले आहे. नर्सेस, डॉक्टर आणी कर्मचा-यांची स्वतंत्र खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. चिनमध्ये या आजाराची ४५ जणांना लागण झाली आहे. २५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात असले तरी आतापर्यंत तेथे दोघांचाच मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती पालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. हे संशयित रुग्ण चिनमधून आलेले आहेत. मुंबईकरांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाही, असेही पालिकेच्या आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
कस्तुरबात चार विशेष कक्ष
चीन-हाँगकाँगमधून आलेल्या प्रवाशांमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे आढळल्यामुळे पालिकेने चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात चार विशेष कक्ष सुरू केले आहेत. यामध्ये प्रत्येकी चार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक विशेष कक्षात डॉक्टर, एक नर्स आणि एका कर्मचार्याचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तसेच विमानतळावर चीनमधून येणार्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पालिका आणि विमानतळ प्रशासनाच्या डॉक्टरांचे पथक तैनात असल्याचेही ते म्हणाले. महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील कस्तुरबा रुग्णालयासह पालिकेच्या आरोग्य सुविधेचा आढावा घेऊन आवश्यक सतर्कतता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
अशी आहेत लक्षणे -
- ‘कोरोना’ संशयितांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळत आहेत. शिवाय श्वाशोच्छ्वास घेण्यासही त्रास जाणवतो.
- ही लक्षणे नेहमीच्या औषधोपचाराने १४ दिवसांनंतरही कमी झाली नाही तर कस्तुरबा रुग्णालयात औषधोपचार करून घ्यावेत असे आवाहनही पालिकेने केले आहे.
रक्ताचे नमुने पुण्याला पाठवले -
मुंबईत आढळलेल्या ‘कोरोना’ संशयितांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणी होणार्या चाचणीनंतर निश्चित माहिती जाहीर करणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.
२८ दिवस देखरेखीखाली ठेवणार -
‘कोरोना’ संशयितांना आवश्यक उपचार सुरू ठेवून पुढील २८ दिवस देखरेखेखाली ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.