मुंबईत गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात देणारे वाडिया रुग्णालय बंद झाले नाही पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीपासून घेतली होती. आज नस्ली वाडिया हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीस उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची देखील या बैठकीस उपस्थिती होती.
महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्यादेखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.