मुंबई सुरळीत, सरकारी बँकांचे कामकाज मात्र ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2020

मुंबई सुरळीत, सरकारी बँकांचे कामकाज मात्र ठप्प


मुंबई - केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात मंगळवारी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा मुंबईत फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र सरकारी बँकांच्या कर्मचा-यांनी संपात थेट सहभाग घेतल्याने बँकांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले. जे जे, सेंटजॉर्ज या प्रमुख हॉस्पिटलमधील चतुर्थ व तृतीय कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केल्याने रूग्णसेवेवर परिणाम झाला. मुंबईतील वाहतूक सेवा मात्र सुरळीत होती. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना संपाचा फटका बसला नाही.

मुंबईतील आझाद मैदानात सकाळपासूनच शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. बंदमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, बँक कर्मचारी सेना महासंघ आदी १० कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे बँकांच्या कामकाज ठप्प झाले होते. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. भारत पेट्रोलियमचे कर्मचारी, भारतीय आयुर्विमा मंडळाचे कर्मचारीही आंदोलनात उतरल्याने कामकाजावर काहीसा परिणाम दिसून आला. इतर आस्थापनांमधील कर्मचा-यांनी काम बंद न करता संपाला पाठिंबा दिला. बेस्ट, रेल्वे, एसटी सेवा सुरळीत होती. वाहतूक सेवेतील कामगार तसेच रिक्षा, टॅक्सी संघटनांनीही कामबंद न करता पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. राज्य सरकारच्या जे जे, सेंट जॉर्ज, या प्रमुख हॉस्पिटलमधील चतुर्थ आणि तृतीय कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन केले. आंदोलनात नर्सेस स्टाफही कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने रुग्णालयाच्या सेवेवर परिणाम झाला.

Post Bottom Ad