दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याच्या शक्यता गृहित धरुन फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 च्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 10 (2) कलम जारी केले आहे. त्यानुसार आपल्याकडे भाडेकरु ठेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही घरमालकाने संबंधित भाडेकरुची संपूर्ण माहिती हद्दीतील पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय आपले घर भाड्याने देऊ नये. तसेच भाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे.
विदेशी नागरिकास भाडेकरु म्हणून ठेवायचे असल्यास संबंधित विदेशी नागरिकाचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्र., पासपोर्ट दिल्याचे ठिकाण व तारीख, पासपोर्ट वैधतेची मुदत, व्हिसा क्र., वर्गवारी, दिल्याचे ठिकाण व तारीख, व्हिसा वैधतेची मुदत आदी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार कारवाईस पात्र राहील, असेही बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.