प्रवासी सुरक्षितता, वाहतूक नियम डावलणार्‍या वाहनांवर कारवाई करा - शिव वाहतूक सेना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2019

प्रवासी सुरक्षितता, वाहतूक नियम डावलणार्‍या वाहनांवर कारवाई करा - शिव वाहतूक सेना


मुंबई - २० डिसेंबर - प्रवासी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांद्वारे होणार्‍या प्रवासी वाहतूकीला शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणून तसेच वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आज शिव वाहतूक सेनेने राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यभरात गेले काही वर्षांपासून असंख्य खाजगी वाहनधारकांद्वारे व्यावसायिकरित्या चालविण्यात येणार्‍या वाहनांमुळे प्रवासी सुरक्षा नियमांचे होणारे उल्लंघन आणि खासगी परवान्याचा होणारा गैरवापर याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

प्रवासी (टुरिस्ट) वाहन कंपन्या आणि वाहनचालकांना बंधनकारक असणारे नियम न पाळणे; वाहन चालविण्याचे योग्य प्रशिक्षण नसल्याने व वाहतूक नियमांविषयी अनभिज्ञ असल्याने वाहनांचे होणारे भीषण अपघात; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची केली जाणारी वाहतूक; जीपीआरएस, फिटनेस सर्टिफिकेट, वेगमर्यादा, पॅनिक बटन या सुरक्षा घटकांचा अभाव यासर्व कारणांमुळे होणारे शासनाचे कररूपी नुकसान या बाबीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी संघटनेद्वारे करण्यात आली. याशिवाय युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे संकल्पनेतून सुरू असलेल्या “मिशन सुखरूप”अंतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना रस्ते सुरक्षा विषयाबाबत केले जाणारे प्रबोधन उपक्रमास प्राधान्य देऊन राज्यातील इतर प्रमुख शहरांसह जिल्हा-तालुका पातळीवरही रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यशाळांचे जास्तीत जास्त आयोजन करण्याची विनंतीही यावेळी परिवहन आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

याप्रसंगी शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस मोहन गोयल, सारथी सुरक्षेचे विनय मोरे यांनी परिवहन आयुक्तांशी वाहतूक प्रश्नावर चर्चा केली असता आयुक्तांनी जलदगतीने योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post Bottom Ad