मुंबई - मुंबई-नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला नाव देण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबत गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे.
या पत्रात गणपत गायकवाड यांनी म्हटलंय की, भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग मुख्य मानबिंदू ठरणारा आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तसेच मुंबई दादर येथील चैत्यभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. हे चैत्यस्मारक बहुजन समाज आणि बौद्ध अनुयायांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. चैत्यभूमी ते दीक्षाभूमी हे बहुजन समाजाच्या श्रद्धेचे स्थान असून या धार्मिक स्थळाला राज्यातून, देशातून हजारो लोक भेट देत असतात. त्यामुळे १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे असं पत्रात म्हटलं आहे.