नागपूर, दि. 16 : विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाली असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती नाईक निंबाळकर यांनी आज केली.
सभागृह नेतेपदी देसाई व विरोधी पक्षनेतेपदी दरेकर यांची निवड झाल्याबद्दल सभापती नाईक निंबाळकर यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर नेऊन बसविले.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल दरेकर यांचे अभिनंदन करताना सभागृह नेते देसाई म्हणाले की, दरेकर यांनी सामाजिक, क्रीडा क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबईतील सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची मदत होईल.
दरेकर अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना म्हणाले की, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पदाला मोठी परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हे पद सांभाळले आहे. सभागृहाचे कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. सभागृहात होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार व वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील, विधानपरिषद सदस्य भाई गिरकर, भाई जगताप, किरण पावसकर, ॲड. अनिल परब, जयंत पाटील, सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर आदींनीही अभिनंदनपर भाषण केले.