पुणे - कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावर 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्यदिनानिमित्त प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा प्रशासन त्यासाठी सज्ज झाले असून यावेळी सोशल मीडिया पोलिसांच्या रडारवर असणार आहे. गाड्यांचे पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, बस सेवा, सभा ठिकाण, आरोग्यच्या सुविधा, आग्निशम दल, पिण्याचे पाणी, लाईट अशा सर्व सुविधांना आवश्यक असणारी तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिवसेंदिवस भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यावर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन 16 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणाहून विजयस्तंभ व वढू येथे जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून या परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा होत असताना मागील काळात काही त्रुटी राहिल्या होत्या. यामुळे काही भाविकांची गैरसोय झाली होती. परंतु, यंदा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यंदा पोलिसांच्या रडावर 'सोशल मीडिया' -
शौर्यदिन साजरा होत असताना सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह पोस्ट, भडकाऊ भाषणे तसेच तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण राबवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
जय्यत तयारी सुरू -
पुणे - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला विजय स्तंभावर शौर्य दिन साजरा होत असताना प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. आज सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी विजयी स्तंभ पाण्याच्या फवाऱ्यांनी स्वच्छ केला. विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला देशभरातून असंख्य कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे येत असतात. त्यामुळे हा शौर्य दिन उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. विजयस्तंभ व परिसरात स्वच्छता मोहीम करून विजयी स्तंभ पाण्याने स्वच्छ करण्यात आला आहे. 31 डिंसेबरच्या रात्री या ठिकाणी विजयी स्तंभाला फुलमाळांनी सजवण्यात येणार आहे.