मुंबई, ता. 30 - नागरिकत्व विधेयक आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी या विरोधात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येत्या 3 जानेवारी ते महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी 30 जानेवारी दरम्यान देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून येत्या 8 जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा या आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केली. "आम्ही भारतीय लोक' म्हणून एकत्र येत असून आम्हाला संविधानाने आमचे नागरिकत्व दिले आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढा देवूू असा इशारा त्यांनी दिला.
संविधानाच्या सरनाम्यातील "आम्ही भारतीय लोक' म्हणून नागरिकत्व विधेयक आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी याला कडाडून करण्याचा निर्णय आज प्रेस क्लब येथे झालेल्या देशातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस विविध राज्यातील शंभरहून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, हर्ष मंदेर आदींचा या बैठकीत सहभाग होता. एनआरसी आणि सीएएच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अत्याचार सुरू आहेत. विरोध मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला जात आहे. त्या विरोधात आता देशभरातील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी "आम्ही भारतीय लोक' म्हणून देशव्यापी आँदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती योगेंद्र यादव यांनी दिली. एनआरसी आणि सीएएच्या विरोधात येत्या 3 जानेवारी रोजी सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीदिनी आदोलनाला सुरूवात होईल. 8 जानेवारी रोजी भारत बंद होईल. यात औद्योगिक बंद होंईल. विविध कामगार संघटना त्यात सहभागी होतील. 12 जानेवारी रोजी युवा दिवस आणि विवेकानंद जयंती आहे. त्या दिवशी युवक रस्त्यावर येतील. 17 जानेवारी रोजी रोहित वेमुला याचा स्मृतिदिन आहे. हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळण्यात येईल. 14 आणि 15 जानेवारी रोजी सामाजिक आणि धार्मिक ऐक्य दिवस पाळळा जाईल. 25 आणि 26 तारखेला स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन व्यापक होईल. 30 जानेवारी गांधी हत्तेचा निधेष केला जाईल. त्यानंतर बहिष्कार आणि यात्रा असा एनआरसी आणि सीएएच्या विरोधात आंदोलनाची रुपरेषा असेल अशी माहिती त्यांनी दिली.
एकेका समुदायाला व्होट बॅंकेतून काढून आपली व्होटबॅक मजबूत करण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. एनआरसी, सीएए विरोधात एनआरसी आणि सीएएच्या माध्यमातून राज्यघटना मोडीत काढण्याचे हे षढयंत्र असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली. धर्माच्या आधारावर नागरिकत्व ठरू नये, समाजात दुफळी निर्माण होता कामा नये, असे मत व्यक्त करून कमी वेळात देशातील संघटना एकत्र आल्या आहेत. हे ऐतिहासिक आंदोलन होईल, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केला.