शिवसेनेच्या महिला नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही तीच भावना व्यक्त केली आहे. 'उद्धव ठाकरे यांनी गेली २० वर्षे अनेक आव्हानांना तोंड देऊन पक्षाचं समर्थपणे नेतृत्व केलं आहे. त्यामुळं आता राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी उचलावी. तमाम शिवसैनिक व आमदारांचंही तेच मत आहे,' असं गोऱ्हे म्हणाल्या.
आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असले तरी ते स्वत: हे पद घेण्यास इच्छुक नसल्याचं कळतं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं करण्याचा पर्याय शिवसेनेपुढं आहे. मात्र, वय आणि अनुभवानं लहान असलेल्या आदित्य यांचा पर्याय काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य होण्यासारखा नाही. आघाडीकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री व अजित पवार, छगन भुजबळ असे उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले आमदार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत काम करावं लागणार असल्यानं उद्धव यांनाच त्यांचं प्राधान्य आहे.