स्वच्छ भारत अभियानावरून पालिका प्रशासनाचे वाभाडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2019

स्वच्छ भारत अभियानावरून पालिका प्रशासनाचे वाभाडे


मुंबई - मोठा गाजावाजा करीत मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या स्वच्छ मुंबई योजनेचा मुंबईत पुरता बोजवारा उडाला आहे. झोपडपट्ट्यां परिसरात घरोघरी शौचालयांचा पुरता बोजवारा उडाला असून ही योजना कागदावर राहिली आहे. अद्याप सिवरेज लाईन नसल्याने शौचालयांचे कामच सुरु झालेले नाही. अनेक ठिकाणी शौचालये आहेत त्यातील अर्ध्यावरून अधिक मोडकळीस आली आहे. तर पाणीच नसल्याने ५० टक्के शौचालये बंद पडले आहेत. बुधवारी झालेल्या स्थायी समितीत हे वास्तव समोर आले. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा करणा-या पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले. 

केंद्र सरकारने सुरु केलेली स्वच्छ भारत अभियान मोहिम देशभर सुरु आहे. या योजनेंतर्गत मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबई करण्यासाठी ही योजना सुरु केली. मुंबईत ६० टक्के झोपडपट्टी परिसर आहे. एकास एक खेटून असलेल्या वस्त्यांत जवळपास शौचालये नसल्याने लोक उघड्यावर जातात. त्यामुळे दुर्गंधी पसरुन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हागणदारीमुक्त मुंबई करण्यासाठी पालिकेने घरोघरी शौचालये उभारण्यासाठी योजना आखली, मात्र वस्त्यांमधील शौचालयांची अत्यंत दुरुवस्था आहे. घरोघरी शौचालय उभारण्यासाठी नागरिकांकडून भरून घेतलेले अर्ज धूळखात पडून आहेत. यावर हरकतीचा मुद्दा मांडत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. राऊत यांच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देत आपल्या विभागातील शौचालयांच्या दयनीय अवस्थेचा पाढा वाचला. मलनीःसारण वाहिनी नाही, म्हणून शौचालयाचे काम रखडले असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र त्यावर अद्याप सोल्यूशन काढण्यात आलेले नाही.
झोपडपट्ट्यांजवळपास शैौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथील रहिवाशांना उघड्यावर शैौचास जावे लागते. त्यासाठी घराच्या जवळपास शौचालय निर्माण केल्यास उघड्यावर जाणा-य़ांची संख्या कमी होऊन मुंबई स्वच्छ राहण्यास मदत होईल हा उद्देश या योजनेमागे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधीही उपलब्ध झाला. यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आला. या य़ोजनेसाठी नागरिकांकडून अर्जही भरून घेण्यात आले. मात्र 50 टक्के झोपडपट्ट्यांत मलनीस्सारण वाहिनी नसल्याने हे शौचालय सुरू करण्यास प्रशासनापुढे अ़डचण निर्माण झाली. या अडचणीवर अद्याप पर्याय काढण्यास प्रशासनाला य़श आलेले नाही. त्यामुळे हे अर्जही मागील तीन - चार वर्षापासून धूळखात पडून असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मुंबईत बहुतांशी झोपडपट्ट्यां जवळपास शौचालयाची सुविधा नाही. काही ठिकाणी आहेत ते नादुरुस्त झाल्याने बंद करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानांर्गत ही योजना राबवली जाते आहे, मात्र या योजनेला अद्याप गती आलेली नाही. निधी असताना, शिवाय अर्ज करूनही अनेक महिने रहिवाशांना प्रतीक्षा का करावी लागते आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

गोवंडी शिवाजी नगरात ५० टक्के शौचालये बंद -
मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. गोवंडी शिवाजी नगर परिसरात सुमारे ९ लाख नागरिकांसाठी अवघे ५०० शौचालये बांधण्यात आली असून यातील ९० टक्के शौचालयांना मलनीःसारण वाहिनी नाही, ५० टक्के शौचालये मोडकळीस आले आहेत. तर ६५ टक्के शौचालयांमध्ये पाणीच नाही. अनेक समस्यांमुळे असलेली शौचालयेही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते हे वास्तव नगरसेवकांनी समोर आणले.
 
स्वच्छ मुंबई पुरस्काराबाबत प्रश्नचिन्ह -
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त मुंबई केल्याचा स्वच्छतेचा पुरस्कार घेणा-या मुंबई महापालिकेच्या या मोहिमेचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. शौचालयांची दुरवस्था झाली असताना स्वच्छतेचा पुरस्कार मुंबई महापालिका कोणत्या निकषावर घेते, यावर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या योजनेबाबत येत्या बैठकीत विभागीय शौोचालयांची माहिती सादर करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad