देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2019

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा


मुंबई -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आम्ही आमदार फोडणार नाही, हे आधीच सांगितलं होतं. आम्हाला कोणताही घोडेबाजारही करायचा नाही. केवळ राष्ट्रवादीचा गट आमच्याकडे आल्याने आणि पुरेसं संख्याबळ असल्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यावर जास्त काळ राजकीय पोकळी ठेवता येत नाही. त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन केल्याचंही ते म्हणाले.

अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय हा दिल्लीचा नव्हता. हा निर्णय आमचाच होता, अशी स्पष्ट कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, अजित पवार यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव होता की नाही? याबाबत मी काहीही बोलू शकत नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांनी काही कारणास्तव राजीनामा देणार असल्याचं मला सांगितलं, एवढंच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Post Bottom Ad