मुंबईत पाण्याची बोंब - स्थायी समिती अध्यक्ष स्वतः पाहणी करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2019

मुंबईत पाण्याची बोंब - स्थायी समिती अध्यक्ष स्वतः पाहणी करणार


मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव भरून वाहू लागले तरीही मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. मागील अनेक महिन्यांपासून असलेली पाणी समस्या सुटणार तरी कधी असा संतप्त सवाल विचारत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, पाणी टंचाईबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने विभागात स्थायी समिती अध्यक्ष स्वतः पाहणी करणार आहेत.

मागील वर्षी तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने प्रशासनाकडून १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईकरांचे १० टक्के पाणी कपात करण्यात आले. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळला. तलाव क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडल्याने जवळपास सर्वच तलाव भरून वाहू लागले. त्यामुळे प्रशासनाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाई मागे घेतली. मात्र त्यानंतरही मुंबईतल्या जवळपास सर्वच विभागात पाणी टंचाई कायम आहे. पाणी टंचाईबाबत नगरसेवकांनी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करुनही ही समस्या सुटलेली नाही. याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीत उमटले. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तलावे भरली व वर्षभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा असतानाही पाणी टंचाई कशी असा सवाल विचारत नगरसेवकांनी वॉर्डातील पाणी समस्येचा पाढाच वाचला. घाटकोपर, कुलाबा, भांडुप, वर्सोवा, परळ, कुर्ला आदी ठिकाणी पाणी समस्येला नागरिकांना कसे तोंड द्यावे लागते आहे, याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला फैलावर घेतले. पाणी समस्येबाबत रहिवाशांच्या तक्रारीकडे अधिका-यांकडून दुर्लक्ष केले जाते. तलावात पुरेसा पाणी असूनही पाणी टंचाईचे नेमके कारण काय याचा प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी किशोरी पेडणेकर, रमेश कोरगावकर, राजुल पेडणेकर, रवी राजा, राखी जाधव आदी नगरसेवकांनी केली. मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पाणी समस्येचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी मी विभागात स्वतः पाहणी करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पाणी समस्येवर नगरसेवक आक्रमक झाले असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काळात जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad