शिवसेनेने निवडणुकीपूर्वी ५०० फुटांपर्यंतच्या घरांना कर माफी आणि ५०० ते ७०० फुटांपर्यंतच्या घरांना करामध्ये सवलत देण्यासंदर्भातील वचननामा जाहीर केला. महासभेत तसा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवला. सरकारनेही निवडणुकीच्या तोंडावर याबाबत शासन निर्णय जाहीर केला. परंतु, करमाफीची अमलबजावणी अद्याप झालेली नाही. करदात्या मुंबईकरांना करमाफीची सवलत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. मुंबईत २०४१ पर्यंतची वाढती लोकसंख्या १७.२४ दशलक्ष इतकी अपेक्षित असून ६४२४ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. यया पार्श्वभूमीवर गारगाई पिंजाळ व दमण गंगा - पिंजाळ नदी जोड प्रकल्पाद्वारे पाण्याचे स्रोत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर पाण्याचे नियोजनासाठी पाणी बचत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
खड्डेमुक्त रस्ते करण्यावर भर देणार आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या भीषण आहे. मुंबईत वायू प्रदूषण टाळण्यासाठी मुंबईकरांनी बेस्ट बसने प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. काळाची गरज असलेल्या अवयवदानासाठी जनजागृती करणार असून आगामी वर्षात ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी म्हटले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, सर्रास होणाऱ्या प्लास्टिकचा वापरावर निर्बंध आणावेत, तसेच महापौर निधी मध्ये भरीव वाढ करण्यासाठी सर्व नागरिक, दानशूर व्यक्ती, सभागृहातील सदस्य आणि कर्मचारी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात प्राणी पाळले जातात. अशा प्राण्यांना काही आजार जडल्यास उपचार मिळावेत यासाठी 'पशु आरोग्य सेवा केंद्र' सुरू करण्याचा मानस आहे. प्रशासनाने या सूचनेचा विचार करावा, असे महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले.