राज्यातील बदलत्या सत्ताकारणामुळे मुंबई महापौर पदाच्या निवडुकीतही बदलाचे वारे वाहतील अशी चर्चा होती. सोमवारी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहिर केले. राज्यातील सत्तेचे समिकरणही अद्याप जुळत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीतून आयत्यावेळी अर्ज भरणार नसल्याचे जाहिर केले. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर व उपमहापौर होणार असल्याचे निश्चित झाले. शिवसेनेत महापौर पदासाठी मंगेश सातमकर, यशवंत जाधव, विशाखा राऊत, बाळा नर, रमाकांत रहाटे तसेच राजुल पटेल हे इच्छुक होते. आपली वर्णी लागावी यासाठी ते सकाळपासूनच मातोश्रीवर ठाण मांडले होते. यापैकी यशवंत जाधव यांनी महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे समजते. मात्र मंगेश सातमकर, विशाखा राऊत, बाळा नर, रमाकांत रहाटे, राजुल पटेल, आशिष चेंबूरकर हे महापौर पदाच्या शर्यतीत होते. अर्ज भरण्याची वेळ ३ ते ६ वाजेपर्यंत होती. मात्र ब-याच प्रतीक्षेनंतर संध्याकाळी सव्वापाच वाजता मातोश्रीवरून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर मालाड - कुरार व्हिलेज प्रभाग क्रमांक ४० येथून पहिल्यांदाच निवडून आलेले व चर्चेत नसलेले अॅड. सुहास वाडकर यांचे नाव उपमहापौर पदासाठी निश्चित झाले. या पदासाठी रमाकांत वाडकर यांचे नाव आघाडीवर होते, मात्र ते आयत्यावेळी मागे पडून वाडकर यांना लॉटरी लागली. तर वरळीच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचे मुंबईच्या महापौर पदासाठी नाव जाहिर झाले. त्यामुळे चर्चेत आघाडीवर नाव असलेल्यांमध्ये मंगेश सातमकर व सद्याच्या सभागृहनेत्या असलेल्या विशाखा राऊत, रमाकांत रहाटे, बाळा नर यांच्यात कमालीची नाराजी पसरली. निवडणूक अर्ज भरताना सातमकर यांनी तेथून काढता पाय घेतला. सकाळपर्यंत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेच नाव महापौर पदासाठी आघाडीवर होते. मात्र त्यांनी स्थायी या शर्यतीतून माघार घेतल्याचे समजते. तर अर्ज भरण्याच्या पाऊणतासापूर्वी उपमहापौर पदासाठी रमाकांत रहाटे यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचे पक्षातून अभिनंदनही सुरु झाले असतानाच अचानक त्यांचे नाव मागे पडले व सुहास वाडकर यांना लॉटरी लागली. त्यामुळे शिवसेनेमधील इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंगेश सातमकर हे शिवसेनेत ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांचे नाव गेल्या महापौर निवडणुकीतही आयत्यावेळी मागे पडले होते. यावेळीही तसेच झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान येत्या २२ नोव्हेंबरला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. मात्र विरोधकांमधून कोणीही अर्ज न भरल्याने केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
वरळीतून पाचवा महापौर
वरळी विधानसभा मतदार संघातून आतापर्यंत पाच जणांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी दत्ताजी नलावडे, नंदू साटम, महादेव देवळे, स्नेहल आंबेकर यांनी महापौर पद भूषवले होते. किशोरी पेडणेकर यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वरळीला पाचव्यांदा महापौर पदाचा मान मिळाला आहे.
खड्डेमुक्त व कचरामुक्त मुंबईचा निर्धार
मुंबईकरांसाठी दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते, प्लास्टिक मुक्त मुंबई करण्याचा निर्धार महापौर पदासाठी अर्ज भरल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी केला. यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. १९९२ पासून शिवसेनेचे काम करत असून २००२ साली पहिल्यांदाच नगरसेविका झाली. आज महापौर बनण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आहे. ही जबाबदारी मुंबईच्या सर्व नगरसेवकांच्या मदतीने पार पाडू, असा विश्वास पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेत पक्षांतर्गत गटबाजी --
यंदा महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. शिवसेनेकडून सुरुवातीला महापौर पदासाठी सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा अग्रेसर होती. तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना संधी मिळणार असे वातावरण होते. सोमवारी मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी नामंकन अर्ज सादर करण्यात आले. शिवसेनेने किशोरी पेडणेकर यांच्या नावावर यावेळी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. महापालिका महापौर दालनातच शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमदार अनिल परब यांच्यासमोरच पेडणेकर यांना प्रखर विरोध दर्शवला. त्यामुळे महापौर पदाचे नाव जाहीर करण्यास महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला सांयकाळी साडेपाच वाजले.
वरळीतील निवडणूक फायद्याची
ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आदित्य ठाकरे यांच्या रूपाने प्रथमच विधानसभा निवडणुकीत उतरली होती. आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी किशोरी पेडणेकर यांनी मोठी मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरे या निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळच्या मेहनतीचे फळ किशोरी पेडणेकर यांना उमेदवारीच्या रूपाने मिळाल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसची माघार
या निवडणुकीत काँग्रेसतर्फे अर्ज दाखल करण्याची तयारी चालली होती. विरोधी पक्षनेते खुद्द रवी राजा अर्ज दाखल करणार होते. मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश नसल्याने त्यांनी अर्ज दाखल केला नाही. संख्याबळ नसल्याने अर्ज दाखल केला नसल्याचे रवी राजा यांनी स्पष्ट केले.
आमदाराच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती
महापौरपदाच्या स्पर्धेतील स्थायी समिती अध्यक्ष मातोश्रीवर चर्चेत गुंतले असल्याने सोमवारी दुपारी २ वाजता असलेल्या स्थायी समिती सभेला ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी आमदार असलेल्या नगरसेवक रमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. रमेश कोरगावकर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.