मुंबई - नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे अशा सूचनाही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत.
नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल कोश्यारी यांनी आज जाहीर केला.